कराड प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून कराड शहरात लूटमारीच्या घटना घडत आहेत. प्रत्येक महिन्यात किमान एक तरी घटना अज्ञातांनी गंठण लंपास केल्याची घटना घडतेच आहे. अशात आता कराड येथील सुप्रसिध्द अशा एका डॉक्टरच्या घरावर सात ते आठ अज्ञातांनी दरोडा टाकून सुमारे 25 तोळे सोन्या – चांदीचे दागिने व 15 लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील वाखान येथील बारा डबरे नावाच्या शिवारात डॉ. राजेश मारुती शिंदे राहतात. या ठिकाणी ते आपल्या घरामध्ये झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ अज्ञातांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील सुमारे 25 तोळे सोन्या – चांदीचे दागिने व 15 लाख रुपये लंपास केली.
या घटनेनमुळे बारा डाबरे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.