सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे.
1) सातारा विधानसभा मतदार संघ (Satara Assembly Constituency)
सातारा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून यावेळी पुन्हा पाचव्यांदा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आज आपला उमेवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कमळ विरुद्ध मशाल अशी लढत होणार आहे.
2) पाटण विधानसभा मतदार संघ (Patan Assembly Constituency)
पाटण विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्यजित पाटणकर अशी लढत होईल असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, या ठिकाणी महाविकास मतदार संघात उद्धव ठाकरे गटाकडे गेला. त्यामुळे या ठिकाणी ठाकरेआणि हर्षद कदम यांना उमेदवारी दिली. दरम्यान, या मतदार संघात आज शंभूराज देसाई यांनी शिंदे गटातून, हर्षद कदम यांनी ठाकरे गटातून तर सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
3) कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ (Karad South Constituency)
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते अतुल भोसले अशी लढत होणार आहे. ड्रामायन, दोघांनी देखील आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळेस दोघांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार हे नक्की.
4) कराड उत्तर विधानसभा मतदार संघ (Karad North Assembly Constituency)
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर त्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे या दोघांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काल दोघांपैकी घोरपडेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुतीकडून घोरपडेंनी तर महाविकास आघाडीकडून पाटलांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.
5) कोरेगाव विधानसभा मतदारसंघ (Koregaon Assembly Constituency)
कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महेश शिंदे विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे हे उमेदवार असून दोघांच्यात अगदी काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. कोरेगाव मध्ये महेश शिंदे यांचे पारडे जरी जड असलं तरी या ठिकाणी शशिकांत शिंदे याच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे.
6) वाई विधानसभा मतदार संघ (Wai Assembly Constituency)
वाई विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, या मतदार संघात महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
7) फलटण विधानसभा मतदार संघात (Phaltan Assembly Constituency)
फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला. या ठिकाणी अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली. त्यामुळे या ठिकाणी दीपक चव्हाण यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
8) माण विधानसभा मतदार संघ (Man Assembly Constituency)
माण विधानसभा मतदार संघात भाजपकडून जयकुमार गोरे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे घार्गे हे उद्या आपला उमेवारी अर्ज भरणार आहेत. या ठिकाणी गोरे आणि घार्गे यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार
सातारा – अमित कदम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
पाटण – हर्षद कदम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
कोरेगाव – शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
माण – माजी आमदार प्रभाकर घार्गे
वाई – अरूणादेवी पिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)