मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये 4 दिवसांत ‘इतका’ पडला पाऊस; येत्या 48 तासांत रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार, दि. १८ रोजी १७६.४ मिलीमीटर व बुधवार, दि. १९ रोजी २७५.०६ मिलीमीटर तर गुरुवार, दि. २० रोजी ३१४.० मिलीमीटर व शुक्रवारी (दि. २१) सकाळी ८ वाजेपर्यंत ९६ मिलीमीटर केवळ ४ दिवसांत ८६१.४६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे आज अखेरपर्यंत २४२०.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत हवामान विभागाकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

महाबळेश्वरमध्ये चारही बाजूने मोठ – मोठे डोंगर असल्यामुळे शहरात दाखल होण्यासाठी वाईकडून येताना पसरणी घाट, मेढा मार्गे येताना केळघर घाट, अंबेनळी व तापोळा घाट असे चार ही बाजूने घाट असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामध्ये चार दिवसांच्या मुसळधार पावसात अंबेनळी घाट हा रायगड हद्दीमध्ये दरड रस्त्यावर आल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णा नदीचे पाणी आल्यामुळे वाहतूक काहीवेळ धीम्या गतीने सुरू होती तर महाबळेश्वर-तापोळा घाटात दोन ठिकाणी दरड पडलेली होती. महाबळेश्वर तालुक्यात बांधकाम विभागाचे काम जोरात असल्यामुळे दरडी व दगड माती काही वेळातच काढून मार्ग सुरळीत करण्यात येत आहे. शुक्रवार, शनिवार पर्यटक महाबळेश्वरमध्ये पाऊस पाहण्यासाठी दाखल होत असतात किंवा ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक भाजीपाल्यासाठी महाबळेश्वरमध्ये दाखल होत असतात.