सातारा प्रतिनिधी | वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने पुन्हा एक चमकदार कामगिरी करत चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून वाहनचोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान रविवार पेठ वाई येथुन होंडा स्पेल्डर गाडी (क्र एमएच ११ एस ४२५४) चोरीस गेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद केला होता.
त्याचप्रमाणे अॅक्टीव्हा गाडी (क्र एमएच ११ डीएल ८५८७) ही परशुरामनगर, वाई या ठिकाणाहुन
चोरीस गेल्याची व महावितरण कार्यालयासमोरुन पिवळ्या रंगाची रेझर स्कुटर गाडी (क्र एमएच ११ डीजी १५७७) ही चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या साऱ्या दुचाकींची चोरी केल्यावरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
या वाहनांची चोरी करणा-या चोरांना शोधून काढण्यासाठी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाईच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाचे प्रमुख फौजदार सुधीर वाळूज व अंमलदारांना सूचना केल्या होत्या. त्यावरून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषण व इतर गोपनीय माहिती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपास पथक घेत होते.
या दरम्यान शहरात गस्त घालत असतांना परखंदी रोड येथे ओढ्याचे कडेला एक संशयित इसम हा नंबरप्लेट नसलेली दुचाकी घेऊन फिरतांना दिसल्याने व संशय आल्याने त्यास थांबवले. त्याच्या ताब्यात असणा-या
काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीबाबत विचारणा केली असता, तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश धनराज पिल्ले (रा. कोंढावळे ता. वाई जि. सातारा) असे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे कसून तपास केला असता, त्याने वाई शहरातून ५ गाडया चोरी केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची ५ वाहने वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीकडून हस्तगत केली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली
कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, विशाल शिंदे, राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, रुपेश जाधव, राम कोळेकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार अरुण पाटणकर, उमेश गहीण, लेंभे हे करीत आहेत.