सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान , पावसाळा आला कि कोयना धरण क्षेत्रामध्ये असलेल्या दुर्गम गावातील रस्ते व पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील लोकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे दळणवळण करता येत नाही. त्यांना बोटीच्या माध्यमातून प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. अशीच सुविधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावास पावसाळ्यात पुरवली जाते. दरे परिसरातील गावातील ग्रामस्थांना शहरात येता यावे म्हणून प्रशासनाच्या वतीने नुकतीच तराफा सेवा सुरु करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव. ते महिना दोन महिन्यातून एकदा तरी आपल्या गावास नक्कीच भेट देतात. या गावासह परिसरातील गावात पावसाळ्यात नदीला पाणी आले की ग्रामस्थांना होडीतून प्रवास करावा लागतो. मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावाकडे जाण्यासाठी रस्त्याद्वारे आणि नदीद्वारेही मार्ग आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा सुरु pic.twitter.com/pNTIDokozi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 4, 2023
मुसळधार पावसामुळे कोयना जलाशयात मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे जलाशय परिसरात असलेल्या जिल्ह्यातील दरे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडे जाण्यासाठी तराफा सेवा सुरु करण्यात आली आहे. कोयना जलाशयात मागील तीन ते चार महिन्यापासून पाणीसाठा नसल्यामुळे ही तराफासेवा बंद करण्यात आली होती. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी ही सेवा सुरू केली जाते. मात्र यंदाच्यावर्षी जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 दिवस अगोदरच तराफा सेवा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाच्या वतीने तापोळा- तेटली आणि दरे या गावातील ग्रामस्थांना प्रवास करता यावा यासाठी तरफ्याची सेवा सुरु करण्यात आली आहे.