जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील भागात वाढली दुष्काळाची दाहकता; टँकरने पाणीपुरवठा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खंडाळा तालुक्यात १ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत.

जिल्ह्यात पूर्वे आणि पश्चिम भागात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे लोणंदच्या पूर्वेस असलेल्या आरडगाव, कापडगाव, चव्हाणवाडी, चांभारवाडी, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक, कापशी, टाकुबाईचीवाडी आदी फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधील नागरिकांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यापैकी बहुतांश गावांत आठवड्यातून एक किंवा दोन वेळा फक्त दहा ते पंधरा मिनिटे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू असून पिण्याच्या पाण्याबरोबर शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पाणी व चार्‍याअभावी जनावरांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी लोणंदच्या बाजारात मिळेल त्या भावात जनावरे विकून दावणी मोकळ्या केल्या आहेत.

फलटणसह अनेक गावे टंचाईग्रस्त

फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील बुरसुंडी धरण सध्या कोरडे पडले असून या धरणाच्या लाभक्षेत्रातील हिंगणगाव, सासवड, आदर्की बुद्रुक, कापशी, परहर बुद्रुक, टाकुबाईची वाडी या गावांमधील ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी केली जात आहे. तर खंडाळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावे ही टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रामुख्याने निंबोडी, पाडळी, बोरी, वेळेवाडी, खेड बुद्रुक, अहिरे, हरळी, म्हावशी, अजनुज, घाटदरे, मोर्वे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

2 लाख लोकांना टँकरचे पाणी…

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई हे माण तालुक्यात आहेत. सध्या तालुक्यातील ९० हजार नागरिकांना टँकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर खटावमधील ५० हजार नागरिक, फलटण तालुक्यातील सुमारे ३६ हजार, कोरेगाव ३२ हजार, खंडाळा ५०६, वाई अडीच हजार, पाटणमधील ३०५ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

असा आहे धरणातील पाणीसाठा

यावर्षी धरणांच्या पाणीसठ्यातही कमालीची घट झाली असल्याने दुष्काळाची दाहकता अधिक वाढणार आहे. नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा 37.05 टक्क्यांवर (4.3 टीएमसी) आला आहे. भाटघर धरणात अजूनही 40.44 टक्के (9.5 टीएमसी) पाणीसाठा आहे. तर वीर धरणात 47.14 टक्के (4.4 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध असून, गुंजवणीत 50.46 टक्के (1.9 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर जिल्ह्यातील धोम धरणात (६.९२ टीएमसी), कण्हेर (३.७८ टीएमसी), कोयना (५७.९४ टीएमसी), बलकवडी (१.५० टीएमसी), उरमोडी २.६४ टीएमसी), तारळी ३.६० टीएमसी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर पावसाळा येईपर्यंत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.