कराड प्रतिनिधी । सातारा येथील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात चार ते पाच युवकांकडून एकत्रित कोयता नाचवून युवकांवर व चारचाकी गाडीवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर दहशत माजविणाऱ्या युवकांच्या टोळीला शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांच्या पथकाने संबंधित टोळीतीळ एक अल्पवयीन मुलासह 5 जणांना ऊसाच्या शेतात चिखलात पाठलाग करून त्यांना जेरबंद केले आहे.
सौरभ नितीन सपकाळ (वय 25, रा. 19 अ रघुनाथपुरा पेठ, करंजे, ता.जि. सातारा), ऋतविक धनंजय पंडीत (वय 21, रा.गडकर आळी कळकाच्या बेटाजवळ शाहुपुरी सातारा), अक्षय संतोष कदम (वय 20, रा. 36 करंजे पेठ, सातारा), अतिष गौतम राजगुरु (वय 22, रा. दौलतनगर, सातारा) तसेच विधी संघर्ष बालक सौरभ नितीन सपकाळ याच्यासह तीन जणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 01 जुलै रोजी सायंकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सेनॉर चौक येथे पाच अज्ञात इसमांनी ओंकार पिलाजी पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 2 हजार 800 रुपये रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच त्यांच्या चारचाकी गाडीवर कोयते मारुन गाडी फोडुन दहशत पसरवली होती. याबाबत तक्रारीवरुन सौरभ नितीन सपकाळ ऊर्फ लाल्या व बबल्या आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्या विरुध्द शाहुपुरी
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करुन फरार झाले होते.
दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास कोयता नाचवुन दहशत पसरविणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दि. 02 जुलै रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना गोपनिय माहिती मिळाली की संबधीत गुन्ह्यातील आरोपी हे म्हसवे येथे वैण्णा नदीच्या परिसरातील शेतात लपुन बसले आहेत. त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे संबंधित ठिकाणी गेले.
त्यानुसार म्हसवे येथील वैण्णा नदीच्या परिसरात पाउस चालु असताना नदीकाठील परिसरात आरोपींचा सलग सात ते आठ तास उसाच्या शेतात व ओढेनाल्यात शोध घेतला. त्यावेळी एका उसाचे शेतात संशयित चार आरोपी बसलेले दिसुन आले. त्यांचा पथकातील पोलिसांनी चिखलातून पाठलाग करुन तीन आरोपींना पकडण्यात यश आले. त्यापैकी एक आरोपी उसाचे शेतातुन पळुन गेला. पळुन गेलेल्या एका आरोपीचा रात्री उशीरापर्यंत शोध घेऊन त्यास पिलेश्वरी नगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित चारही आरोपींना पोलीस ठाण्यात हजर करुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसुन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच सौरभ नितीन सपकाळ यास तांत्रिक माहितीच्या आधारे शिराळा जि. सांगली येथुन ताब्यात घेतले. संबंधित आरोपीकडून दहशत माजविण्यासाठी वापरलेला कोयता, लोखंडी पाईप, दोन दुचाकी 2 हजार 100 रुपये रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात गोपनीय माहितीच्या व तांत्रिक माहितीच्या आधारे कोयता नाचवुन दहशत माजविणाऱ्या आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोहवा. सुरेश घोडके, सचिन माने, पोलीस नाईक निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्रिल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.