पाटण प्रतिनिधी | कराड,पाटण तालुक्यासह ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे ढेबेवाडी विभागातील डोंगरावरील अनेक गावचा रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर जाणाऱ्या पवारवाडी (कुठरे) निगडे मार्गावरील घाटातील रस्ता मुसळधार पावसामुळे जाधववाडी दरम्यानच्या धोकादायक वळणावरच खचला आहे. वळणावरच रस्ता खचला असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अगोदर पवारवाडी (कुठरे) निगडे मार्गावरील हा घाट धोकादायक असल्याने वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी लागते. एका बाजूला धरण, तर दुसऱ्या बाजूला धोकादायक वळण, अशी या घाटाची अवस्था आहे. घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून या धोकादायक वळणावर संरक्षक भिंती नसल्याने एखाद्या अपघात झाला तर वाहन थेट दरीत कोसळून धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. या मार्गावर कराड आगाराची एसटी सुरू आहे. या मार्गावर अनेक गावे असल्याने येथील लोकांना हा एकमेव मार्ग आहे.
काही वर्षांपूर्वी या मार्गावरील धोकादायक वळणावर एसटी बस फसली होती. चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी थांबल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या मार्गावरच काही वर्षांपूवी ट्रक दरीत कोसळला होता. येथे कायम सतर्क राहून वाहने चालवावी लागतात.अरुंद रस्त्याची अडचण पवारवाडी, जाधववाडी, मत्रेवाडी, निवी, निगडे कसणी, घोटील, माइंगडेवाडी आदी गावांसह वस्त्यांवरील लोकांची या मार्गावरून रहदारी असते. या घाटातील वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहेत.