सातारा प्रतिनिधी । राज्यात अगोदरच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पावसाअभावी धरण, तलावयात कमी प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहान करण्यात आले असताना वाई तालुक्यातील धोम उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. मागील पन्नास दिवसांपासून धोम उजव्या कालव्यात 190/200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु होता. साताऱ्यातील व्याजवाडी परिसरात घटना घडली असून एकाच महिन्यात वाई तालुक्यात दोन ठिकाणी कालवा फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
वाई तालुक्यात धोम उजव्या कालव्याच्या माध्यमातून परिसरातील शेती क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या उजव्या कालवा फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी ओढे, नाल्याच्या मार्गे वाहून गेले. यामध्ये ओढ्या लगत असलेल्या विहिरींचे देखील व पिकांचे देखील नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने कालव्यातील पाणी बंद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच धोम धरणाचा डाव्या कालव्याला भगदाड पडून ऊस तोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले होते. यामुळे मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मागील एक महिन्यापासून हा कालवा सुरु होता.
घटनास्थळी पाटबंधारे अभियंता योगेश शिंदे, उपअभियंता निलेश ठोंबरे, शाखा अभियंता अजय गोळे यांनी भेट दिली. अगोदरच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना आता वाई तालुक्यात धोम उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे कालवा परिसरातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.