सातारा प्रतिनिधी | धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनापासून तीन युवकांनी म्हसवड येथील पालिकेसमोर उपोषण सुरू केले असून, या राज्यव्यापी आरक्षण मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी आज धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ धनगर व धनगड या शब्दांच्या फेऱ्यात गेली ७० वर्षे धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आला आहे. दरम्यान, येथील पालिकेसमोर उपोषणास बसलेल्या तीन युवकांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य व हरणाई उद्योग समूहाचे वरिष्ठ रणजितसिंह देशमुख यांनी नुकतीच भेट दिली.
धनगर समाजाला त्यांचा हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी आगामी काळात सर्व आमदार, खासदार यांनी लक्ष घालून धनगड या शब्दाऐवजी धनगर हा शब्द दुरुस्त करून धनगर समाजाला एसटीमधून सवलत मिळावी, यासाठी केंद्र व राज्य तर सरकारने राष्ट्रपतींकडे दुरुस्तीची ना शिफारस करण्यासाठी एकत्र येऊन धनगर समाजाला न्याय देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर भेटी घेणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. याबरोबरच धनगर आरक्षण मागणीला पक्षाचा व माझा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
याबरोबरच या आंदोलनास अनेक गावातून पाठिंबा मिळत असून, आंदोलनस्थळी रोज एका गावचे गजी नृत्य पथक दिवस रात्र धनगरी ओव्यातून आपले प्रश्न पोटतिडकीने मांडू लागले आहेत. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र – प्रदेश सचिव शिवाजीराव यादव, उपाध्यक्ष देवानंद जगताप आदींनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागणीस जाहीर पाठिंबा दिला आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन धनगर समाजास एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी आपण स्वतः सरकारकडे आग्रह धरून हा समाज ज्या शब्दासाठी झगडत आहे, तो शब्द दुरुस्त करून या समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.