कराड प्रतिनिधी | कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या २१ जनावरांची पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कराड येथील बाजार समिती आवारात असलेल्या एका शेडमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत प्रतीक आप्पासाहेब ननावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाम हाजी व्यापारी (रा. सदर बाजार, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडमधील बाजार समिती आवारात असलेल्या एका शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने २१ जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती नवी मुंबईतील गोजारी गोशाळेचे व्यवस्थापक प्रतीक ननावरे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलिस ठाण्यात दिली. तसेच ते स्वतः कराडमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने बाजार समिती आवारातील शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी चार खिलार जातीचे बैल, सोळा कोकणी जातीचे बैल, एक रेडा अशी २१ जनावरे आढळून आली.
संबंधित जनावरांच्या चारा- पाण्याची तसेच देखभालीची कसलीही व्यवस्था न करता त्यांना क्रूरतापूर्वक डांबून ठेवल्याचे दिसून आले. तसेच जनावरांच्या कानामध्ये ‘इअर टॅगिंग’ ही करण्यात आले नव्हते. जनावरांना जखमा झाल्या होत्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधित जनावरांची सुटका करून याप्रकरणी गुलाम हाजी व्यापारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत. जनावरांचा छळ प्रकरणाचा कराड शहर पोलिस कसून चौकशी करत आहेत.