कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला झाली सुरुवात, 15 जुलैपर्यंत पुरेल ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचं नवीन तांत्रिक वर्ष सुरू

कोयना धरणाचं १ जून ते ३१ मे हे तांत्रिक वर्ष असतं. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानुसार १ जून पासून ६७.५ टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरीत पाणीसाठा हा पुर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक होतं. त्या तुलनेत यंदा केवळ अर्धा टीएमसी पाणी कमी आहे.

Koyna Dam News

कोयना धरणात पाणीसाठा किती?

कोयना धरणात शनिवारी (दि. १ जून) सकाळी ८ वाजता एकूण १७.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातील ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा मृत मानला जातो. त्यामुळे १२.४६ इतका निव्वळ पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पायथा वीजगृहातील दोन युनिटमधून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती देखील पूर्ण क्षमतेनं सुरू आहे.

धरणातील सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल : नितीश पोतदार

पाऊस लांबला तरी कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. वीजनिर्मितीवर देखील परिणाम होणार नाही, अशी माहिती कोयना धरणाचे अधीक्षक अभियंता नितीश पोतदार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.