कराड प्रतिनिधी । दोन दिवस मुसळधार पावसाने कराड तालुक्यात चांगलेच झोडपून काढले. रात्रीदिवस पडत असलेल्या पावसामुळे कराड तालुकयातील वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे आणेगावाला जोडणारा पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला. दरम्यान, याठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल होत या पथकाने गावातील तरुणांसोबत नदीकाठी असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले.
यावेळी एडीआरएफ पथकातील जवानांसोबत गावच्या पोलीस पाटील सुनीता पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दादासो पाटील, सरपंच किसन देसाई, संदीप देसाई, तलाठी आंबेकरी, सर्कल काळे, कोतवाल कोमल जाधव, ग्रामस्थ गणेश देसाई, सचिन देसाई, सागर देसाई, प्रशांत देसाई यांनी परिश्रम घेतले.
कराड तालुक्यातील वांग नदीवरील पाणीपातळी रविवारी सायंकाळी हळूहळू वाडु लागली. यानंतर कराड तालुका परिसरात जोरदार पावसामुळे रविवारी वांग नदीसह ओढ्यांवरील दहाहून अधिक लहान – मोठे पूल पाण्याखाली गेले. नदीकाठी असलेल्या शेतात पाणी शिरल्यामुळे तसेच शेतीचे बांध पाण्याच्या दाबाने फुटल्याने पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, वांग नदीसह ओढे, नाली दुथडी भरून वाहू लागली असून नदीवरील बाचोली, भालेकरवाडी शितपवाडी, खळे येथील तसेच अनेक ठिकाणी ओढ्यांवरील पूल रविवारी पाण्याखाली गेल्याने दळणवळण विस्कळित झाले होते.
जिंती भागातील दरडग्रस्त जितकरवाडी आणि त्या परिसरातील काही वाड्या-वस्त्यांना जोडणारा नदीत भराव टाकून तयार केलेला कच्चा पूल रविवारी सायंकाळी पाण्याखाली गेल्याने बिकट स्थिती निर्माण झाली होती. एका बाजूला मराठवाडी धरणातील पाण्याचा फुगवटा आणि दुसरीकडे नवीन पुलाच्या बांधकामाचा आणि पुनर्वसनाचा पत्ता नसल्याने वाढलेल्या अडचणी यामुळे ही गावे कोंडीत सापडली आहेत. ढेबेवाडीसह अनेक गावांतील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. डोंगर भागात पावसाचा जोर अधिक होता. कसणी परिसरात नुकतीच रोप लावणी केलेली भाताची तसेच अन्य काही शिवारे ओढ्याचे पाणी उलटून आणि बांध फुटून वाहून गेली.
वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली की पूल पाण्याखाली जातो : किसन देसाई
दरवर्षी पावसाळा आला की वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ होते आणि कोळे व आणे गावाला पूल पाण्याखाली जातो. रविवारी रात्री वांग नदीवरील पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी गेले. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद झाली असल्याची प्रतिक्रिया आणे गावचे सरपंच किसन देसाई यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.