कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती न्यायालयीन लढा देवून उठली असल्याने विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकारमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. त्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयीन लढाई जिंकून कराड उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांवरील स्थगिती आदेश उठविण्यास राज्य सरकारला भाग पाडले. स्थगिती उठलेली सर्व कामे सुरू झाली आहेत.
सातारा तालुक्यातील नांदगाव येथे आ. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना 2023 – 24 मधून साकव योजनेंतर्गत कन्हेर उजवा कालव्याच्या कॅनॉलवर गावच्या हद्दीत साकव पूल बांधण्यासाठी 53 लाख 84 हजार मंजूर झाले. त्या साकव पुलाचे त्याच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.