पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील बांधवाट आणि पाबळवाडी या गावांमध्ये तीन दिवसांत चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. बांधवाट येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी घरामागे असलेल्या शेडमधील दोन शेळ्या रात्री ९:३० वाजेच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तारळे परिसरातील काही गावे डोंगरावर, तर काही गावे डोंगर पायथ्याच्या परिसरात वसलेली आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या विभागात मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. यामध्ये कमी महिन्याच्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेळीपालन व्यवसायालाही प्राधान्य देण्यात येते. मात्र, गत काही वर्षांत तारळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने शेळ्यांवर संक्रांत आली आहे. बांधवाट येथील कृष्णात सूर्यवंशी यांचे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी घर आहे.
घराच्या पाठीमागेच गुरांचे शेड आहे. त्यांच्याकडे दोन म्हशी व पाच शेळ्या आहेत. रात्री ९:३० वाजेच्या न सुमारास नेहमीप्रमाणे सूर्यवंशी यांनी जनावरांना चारा टाकला. त्यानंतर जेवण करायला ते घरामध्ये गेले. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. काही वेळाने जनावरांच्या शेडमधून शेळ्या मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला परिसरातील ग्रामस्थ हातात बॅटरी – घेऊन शेडमध्ये धावले. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. ग्रामस्थांनी शेडात जाऊन पाहिले असता एक शेळी बिबट्याने ठार केल्याचे दिसून आले, तर दुसरी शेळी गंभीर जखमी होती. त्या शेळीचाही मृत्यू झाला.
पाबळवाडी येथील आनंदा सूर्यवंशी यांची शेळी व श्रीमंत सूर्यवंशी यांची शेळी रानात चरायला गेल्यावर बिबट्याने हल्ला करून त त्यांना ठार केले आहे. तीन दिवसांत चार शेळ्या बिबट्याने ठार केल्यामुळे न शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती – मिळताच वन विभागाकडून तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.