कोयना धरणातील पाण्याने गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद

कोयना धरणाच्या निर्मितीपासून शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची घट होण्याची यंदाची सहावी वेळ आहे. बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडल्यामुळे भेगाळलेल्या पात्रात बोटी विसावल्या आहेत. बोट व्यवसाय बंद असल्याने पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे. परिणामी, बोटींग व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोयनेचा जलाशय पडला कोरडा ठाक

महाबळेश्वर ते कोयनानगर दरम्यान ९२ कि. मी. लांबीचा शिवसागर जलाशय (बॅक वॉटर) आहे. यंदा मान्सूनच्या पावसाला अजुनही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. बॅक वॉटरचा परिसर उघडा पडला आहे. कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यातील १०७ गावांसाठी असणाऱ्या शासकीय आणि खासगी बोटी बंद आहेत. त्यामुळे भेगाळलेल्या पात्रातून, दलदलीतून वाट काढत नागरिक बाजारपेठ गाठत आहेत.

बुडीत गावांचे अवशेष पडले उघड्यावर

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांचे अवशेष सध्या उघडे पडले आहेत. प्राचीन मंदिरे, गावठाणे पाहायला मिळत आहेत. पुनर्वसित झालेले धरणग्रस्त नागरीक आपल्या मूळ गावांचे अवशेष पाहण्यासाठी पायपीट करत शिवसागर जलाशयाकडे येत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.