कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात रिमझिम पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून या क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असून पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पडलेलय पावसामध्ये महाबळेश्वरने आज १ हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १४, नवजाला ३८ आणि महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना जलाशयाची पाणीपातळी २०४३.०७ फूट झाली. तसेच एकूण पाणीसाठा १५.४४ टीएमसी इतका झाला आहे.
कोयना जलाशयात प्रतिसेकंद ८ हजार ६२० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, काल पश्चिम भागात रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडत असल्यामुळे या धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत चालला आहे. तरीही धरणे भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना पाऊस आला, की घातमोड होऊन पेरणीची कामे थांबवून घरी परतावे लागत होते. आज सकाळी १० वाजेपर्यंत रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, १० वाजल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने दिवसभर शेतकरी पेरणीची कामे उरकण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.