कराड प्रतिनिधी । उशिरा का होईना पावसाळा सुरुवात झाली असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजून भरपूर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सुरु झाला की, काही दिवसात धबधबेही ओसंडून वाहू लागतात. अशाच एक पाटण तालुक्यातील कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. पावसाळ्यात कोयनानगर परिसरातील वातावरण बघण्यासारखे असते. या ठिकाणी धबधबे प्रवाहित होऊ लागले असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पाण्यासाठी आता पर्यटकांचीही पाऊले वाळू लागली आहेत.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भागात जून महिन्याच्या अखेरीस हलक्या, मध्यम सरींसह पावसाचे आगमन झाले आहे. डोंगरकपारीसह परिसरात दाट धुक्याची दुलई आणि पावसाच्या सरी अशा अल्हाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रांगांमधून पाटणच्या पश्चिमेकडील कुंभार्ली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या जलधारा पावसाळ्यात पर्यटकाना खुणावत असतात. जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण, नेहरू गार्डन व शिवसागर जलाशयाचे छोट्या-छोट्या खोऱ्यांतून विस्तारलेले पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
गेल्या २ दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या धरणात १०.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. गत २४ तासांत पडलेला पाऊस कोयना ४९. एकूण १४० मिलीमीटर, नवजा ४४/१६० मिलिमीटर, महाबळेश्वर ८७/२०८ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.