सातारा प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. आता लक्ष लागलं आहे ते सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? जिल्ह्यातील पालक मंत्रीपदासाठी आ. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle), आ. मकरंद पाटील (Makrand Patil), आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या शनिवारी दि. 14 डिसेंबर रोजी होणार असून दुपारी 12 च्या मुहूर्तावर शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दि. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे 40 मंत्री शपथ घेणार आहेत. पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाच्या वाट्याला कोणतं खात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार मंत्रिपदे ?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहळी झिरवळ यांचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यात अनिल पाटील, दत्ता भरणे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला?
शिवसेनेकडून ५ ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे अडीच अडीच वर्षे मंत्रिपदे फिरती राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
भाजपकडून कोण कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार?
भाजपकडून सर्वाधिक १० मंत्रि शनिवारी शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचा समावेश असू शकतो. त्याशिवाय मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, राणा जगजीतसिंह पाटील, राहुल ढिकाले, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.