सातारा प्रतिनिधी | मुंबईवरून पिंपोडेकडे मालाचा टेम्पो घेऊन येत असताना चालकाने अविनाश सुरेश शिंदे (वय १९, रा. शाळगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या क्लीनरला गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपोडे बुद्रुक येथील कृष्णात शामराव लेंभे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा टेम्पो (एमएच ११ डीडी ८८५०) गुरुवारी दि, ५ रोजी सायंकाळी ९ वाजता म्हापे (नवी मुंबई) वरून केरळकडे माल भरून निघाला होता. या टेम्पोचा चालक मिथुन सर्जेराव शिंदे (रा. गणेशवाडी ता. सातारा) व क्लीनर अविनाश शिंदे हे दोघे गाडी घेऊन येत होते. नवी मुंबई ते पिंपोडे या प्रवासादरम्यान चालक मिथुन शिंदे याने क्लीनर अविनाशला गंभीर मारहाण करून ठार केले.
रात्रीच्या सुमारास मृतदेहासह गाडी पिंपोडे बुद्रुक येथील गाडी मालक कृष्णात लेंभे यांच्या घरासमोर लावून तो फरारी झाला. ही घटना सकाळी गाडीचे दार उघडल्यानंतर लेंभे यांच्या लक्षात आली. कृष्णात लेंभे यांनी आज दि, ७ रोजी वाठार पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने तपास करीत आहेत.