4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षाच्या तरूणाचा कोयना नदीपात्रात आढळला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । घरातील कोणास काहीच न सांगता अचानक घरातून चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या पाटण तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आज कोयना नदीपात्रात आढळून आला. रूपेश मनोहर चव्हाण (वय ३०, बनपेठ, येराड, ता. पाटण) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बनपेठ – येराड, ता. पाटण येथील रूपेश मनोहर चव्हाण हा ३० वर्षीय तरुण हा मंगळवारी सायंकाळपासून घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर दोन दिवस त्याच्या नातेवाईकांनी पै-पाहुण्यांसह सर्वच ठिकाणी शोधशोधा केली असता तो सापडून आला नाही. त्यानंतर गुरूवारी याबाबत तो हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवार, दि. 29 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तामकडे गावाच्या हद्दीतील कोयना नदीपात्रातील झाडामध्ये एक मृतदेह अडकलेला असल्याचे गावातील ग्रामस्थांनी पाहिले. मृतदेहाचा चेहरा पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पाटण पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह पात्राबाहेर काढून रूपेश चव्हाण याच्या नातेवाईकांना दाखवला असता त्यांची खात्री पटली. त्यानंतर पाटण येथील ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. त्यानंतर तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी कोयना नदीकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार ए. एम. आवाड करत आहेत.

तरुण होता उत्तम क्रिकेट खेळाडू

बनपेठ – येराड, ता. पाटण येथील रूपेश याला क्रिकेटचे खूप वेड होते. शिवाय तो सनी स्पोर्टस येराडचा दर्जेदार क्रिकेट खेळाडू म्हणून तालुक्यात परिचीत होता. एक उत्तम खेळाडू असून तो घरातून अचानक निघून जाणे व नंतर त्याचा मृतदेह कोयना नदीत आढळून येणे या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.