सातारा प्रतिनिधी । दरवर्षी पावसाळा जवळ आला की, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरे, बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यांना दर्जेदार आणि उत्तम प्रतीची बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून देखील अनुदान तत्वावर बियाणांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली जाते. अशीच तयारी यंदा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी असून, मागील आठवड्यापर्यंत १० हजार ५६५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्धही झाले होते. तर यावर्षीही कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहे. या पथकास बोगस खते आणि बियाणे विक्री करताना कोणी आढलळयास त्याच्यावर कारवाई करून दुकानांचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच संबंधित परवानाधारकास तुरुंगवासही भोगावा लागणार आहे.
सातारा जिल्ह्यातील दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरीपसाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
खरीप हंगामसाठी १० हजार ५६५ क्विंटल बियाणे उपलब्ध
गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरिपावर दुष्काळाचे सावट असले तरी कृषी विभागासह शेतकरीही तयारीत आहेत. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा त समावेश आहे. यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणे अपेक्षित आहे. तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठेत १० हजार ५६५ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे. त्यामुळे लवकर पेरणी सुरू केली तरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत.
१ लाख ९ हजार ५०१ मेट्रिक टन खतसाठा मंजूर
शासनाने खरीप हंगामाकरिता १ लाख ९ हजार ५०१ मेट्रिक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. १ एप्रिलपासून १५ मेपर्यंत २२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले, तर ११ हजार ४८० मेट्रिक टन खताची विक्री झाली. सध्या ७० हजार मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे. परिणामी खताची टंचाईही भासणार नाही.