सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीकांची ई पीक पाहणी केली होती, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तरी अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी आणि अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवासी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. या अर्थसाहाय्यासाठी ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्यात ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे. तसेच वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही. अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे .पण अर्थसाहाय्यासाठी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनी आधार संलग्न करणे गरजेचे आहे.