फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीतच ‘खाकी’नं ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवड फाटा, ता. कराड येथे शेतकऱ्यांच्या वेशात शर्यतीमध्ये घुसून पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.

अक्षय अनिल तळेकर (वय २९, रा. हरपळवाडी, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील अक्षय तळेकर याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. फरार असताना त्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबतही कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे दाखल असताना आरोपी अक्षय तळेकर हा गत काही महिन्यांपासून फरार होता.

दरम्यान, आरोपी अक्षय तळेकर हा पाचवड फाटा येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. अक्षय तळेकर हा शर्यतीतील बैलगाडीवर चालक होता. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसारखा पेहराव करून पाचवड फाटा येथील बैलगाडी शर्यत गाठली. त्याठिकाणी शिताफीने अक्षय
तळेकर याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.