कराड प्रतिनिधी | दीड वर्षांपासून २० वर्षीय युवतीचा सतत पाठलाग, विनयभंग करत मानसिक त्रास देणाऱ्या तरुणाला अखेर कराड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निखिल अशोक मोहिते, असे आरोपीचे नाव आहे. पीडित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर २४ तासांत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावातील पीडित युवतीचा गेल्या वर्षभरापासून संशयित आरोपी सतत पाठलाग करत होता. सार्वजनिक ठिकाणी विनयभंग करणे, बदनामी आणि मानसिक त्रास देत होता. त्रास असह्य झाल्याने मंगळवारी (८ जुलै) सकाळी पीडित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. विनयभंगासह विविध गंभीर कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज (गुरूवारी) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शादीवान यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकिलांनी काम पाहिले. सरकार पक्षास सहाय्य म्हणून पीडितेच्या वतीने ॲड. महादेव साळुंखे यांनी बाजू मांडली.
कायद्याला न जुमानता त्याने पुन्हा युवतीला त्रास द्यायला सुरुवात केली
पीडित युवतीने यापूर्वी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयित आरोपी विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, कायद्याला न जुमानता त्याने पुन्हा युवतीला त्रास द्यायला सुरुवात केली होती. सार्वजनिक ठिकाणी वारंवार विनयभंगही करण्यात आल्याची आपबिती पीडितेने आ. चित्रा वाघ यांना कथन केली आहे.