कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात गत आठवड्यात घरफोडी, मारामारी आणि लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर पोलिसांकडून कारवाई होते न होते तोवर कराड पंचायत समितीच्या माजी उपसभापतीच्या मुलाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींचा अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरुन झालेला वादाचे रूपांतर थेट खुनाचा कट रचण्यापर्यंत गेल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष सुहास बोराटे (रा. शिरवडे, ता. कराड) यांच्या खुनाचा कट आखणाऱ्या चौघांना मंगळवारी तळबीड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रितम चंद्रकांत पाटील (वय- 39, रा. वहागाव, ता. कराड), सागर अशोक पवार (वय 31) व किरण मोहन पवार (वय 31, रा. वहागांव ता. कराड), ऋषीकेश अशोक पाटील (वय 22, रा. येणके ता. कराड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्याच्याकडून दुचाकीही, कुऱ्हाड, चाकू, कोयता जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत वहागाव मधील प्रीतम चंद्रकांत पाटील यांनी हॉटेल आनंद चालविण्यास घेतले आहे. त्याच्या हॉटेलमध्ये दि. ७/७/२०२३ रोजी शिरवडे ता. कराड येथील कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष सुहास बोराटे (रा. शिरवडे ता. कराड) हा जेवण करण्यासाठी आला. यावेळी त्याचा व हॉटेल चालक प्रितम पाटील यांच्यात जेवणाच्या ऑर्डर देण्यावरुन वाद झाला. त्यावेळी आयुष याने त्याचा भाऊ वेदांत तसेच बाळू यादव यांना बोलावून घेऊन आयुषने आनंद हॉटेल येथे हॉटेलची मोडतोड व दुचाकीची मोडतोड केली व ते निघून गेले.
वादाचा राग मनात धरुन हॉटेल चालक प्रितम चंद्रकांत पाटील तसेच त्याचा मित्र सागर अशोक पवार तसेच कामगार किरण मोहन पवार (रा. वहागांव) व ऋषीकेश अशोक पाटील (रा. येणके ता. कराड) यांनी आयुषला संपवण्याचा कट दि. १०/७/२०२३ रोजी रचला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी आयुष सुहास बोराटे हा एकटाच शिरवडे येथे असल्याची माहिती प्रितम पाटील याला मिळाल्यानंतर त्यांनी हॉटेल आनंद येथे एकत्र येऊन आयुष सुहास बोराटे याला संपवण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये असलेली कुऱ्हाड, चाकू, कोयता घेतले.
सागर अशोक पवार यांच्या दुचाकीवरील नंबर प्लेटवरील नंबर पुसत चौघे त्या दुचाकीवरून शिरवडे गावी निघाले होते. यावेळी रात्रगस्त पेट्रोलिंग करता फिरत असलेल्या तळबीड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार वाघमारे व चालक पो.कॉ. पाटील यांना बेलवडे हवेली गावच्या हद्दीत ११/७/२०२३ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिसले. तेव्हा महिला पोलीस हवालदार वाघमारे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी चौघांना गाडी थांबण्यास सांगितले. मात्र, चौघांनी दुचाकी न थांबविता भरधाव वेगात नेली. यावेळी शिरवडे गावी जात असलेल्या चौघांबाबतची माहिती महिला पोलीस हवालदार वाघमारे यांनी पोलिस ठाण्यात दिली.
यावेळी ठाणे अंमलदार काका पाटील तसेच पो. कॉ. फडतरे यांनी दुचाकीवरून जाणार्या चार संशयीतांना तासवडे टोलनाक्याजवळ पकडले. त्या चौघांनाही ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपण आयुष सुहास बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. व त्यांनी महामार्गाच्या रस्त्याकडेला टाकलेली कुऱ्हाड, चाकू, कोयता व दुचाकी ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व सहाय्यकी पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांनी केली. संबंधित चारही आरोपीविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.