सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, १३ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये साखर सहसंचालकांकडे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे.
सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बीबियाणे, किटकनाशकाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. आता तोंडावर दसरा आणि दिवाळी सण आला आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. तसेच २०२१- २२ मधील जाहीर केलेल्या दरात कपात केली, तेही पृसे शेतकऱ्यांना द्यावेत. तर दुसरा हप्ता २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपाध्यक्ष संजय जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, राजू घाडगे, मोहन घाडगे, बाळासाहेब गोळे, विठ्ठल पवार, जोतिराम झांजुर्णे, महादेव डोंगरे, महेंद्र सांळुखे,जनार्दन आवारे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील ‘या’ कारखान्यांना निवेदन…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये रॅलीने पहिल्यांदा शेंद्रेतील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुइंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखाना, कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या जरंडेश्वर शुगर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. अशाचप्रकारे इतर साखार कारखान्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.