गुढे-पाचगणीसह येवती-म्हासोली उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी; सर्वेक्षणास उद्यापासून होणार सुरुवात

0
28

कराड प्रतिनिधी । सांगली आणि सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी उद्या मंगळवार दि. २१ रोजी पासून वारणावती येथून सुरुवात होणार आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, तसेच सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण अशा तीन तालुक्यांतील 105 गावांसाठी गुढे-पाचगणी व येवती-म्हासोली अशा दोन वेगवेगळ्या उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाकडून 1 कोटी 65 लाख 44 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाने मणदूर (ता. शिराळा) येथील हुतात्मा स्मारक परिसरात तब्बल 38 दिवस या योजनेसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर मंत्रालयात डॉ. पाटणकर, आमदार सत्यजित देशमुख, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ही योजना कशी लाभदायी आहे, हे पटवून देण्यात आले. त्याचे फलित म्हणून ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनांमुळे शिराळा, कराड व पाटण या तिन्ही तालुक्यांतील तब्बल वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

शिराळा तालुक्यासाठी गुढे-पाचगणी उपसा जलसिंचन योजना, तर कराड व पाटणसाठी ‘येवती-म्हासोली’ योजनेला शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शिराळा तालुक्यातील 60, कराड दक्षिण भागातील 35, तर पाटण तालुक्यातील 10 गावांना लाभ होणार आहे. दुर्गम आणि वंचित भागातील शेतकर्‍यांना पाणी बांधापर्यंत येण्यासाठी या योजनेतून प्रयत्न होणार आहेत. गुढे-पाचगणी योजनेसाठी 730 कोटी, तर ‘येवती- म्हासोली’ योजनेसाठी 400 कोटी खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता होईल. अनेक शेतकरी बागायतदार होतील. रोजगारासाठी होणारी भटकंती थांबेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्यामुळे आर्थिक दर्जाही उंचावेल.

तालुकानिहाय समाविष्ट गावे…

कराड तालुका : शेवाळेवाडी, अकाईवाडी, धोत्रेवाडी, जिंती, कोचरेवाडी, चव्हाण मळा, भुसाळ शिरंबे, महारुगडेवाडी, खुडेवाडी, मनव, सावंतवाडी, चोरमारवाडी, एनपे, माटेकरवाडी, शेवाळेवाडी, येळगाव, लोहारवाडी, गवारकरवाडी, मुळीकवाडा, मोटेगाव, गणेशवाडी, मस्करवाडी, येवती, काजारवाडी, मुटलवाडी, भरघोशी, भरेवाडी, शेवाळेवाडी, घराळवाडी, काटेकरवाडी, दुधडेवाडी, हनुमंतवाडी, कुंभारवाडा, शेळकेवाडी येवती, शेळकेवाडी म्हसोली, शेवाळेवाडी म्हसोली, वीरवाडी, म्हासोली सवादे, लटकेवाडी, हवेलवाडी, नाईकवडीवाडी, पवारवाडी, बांदेकरवाडी, ओंड, पाचुपतेवाडी, तुळसण, विठोबाचीवाडी, थोरात मळा, कोंडोशी, पाटील मळा, नवीन नांदगाव, नांदगाव, पवारवाडी, शेवाळेवाडी नंबर एक, शेवाळेवाडी नंबर दोन, उंडाळे, टाळगाव, शेवाळवाडी, भोगाव, शेवाळवाडी. आणि पाटण तालुका : सावंतवाडी, लोहारवाडी, चव्हाणवाडी, रामेश्वरवाडी, शेडगेवाडी, काळेवाडी, भरेवाडी, मुटलवाडी, आचरेवाडी, कोळगेवाडी.