कराड प्रतिनिधी । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित दिसले. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे पुन्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्रित येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी कराड येथे आज मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले. “मी कराडला येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत असते. मी कालच या ठिकाणी येणार होते. मात्र, काल डीपीडीसीच्या बैठकीमुळे येता आले नाही. मात्र, आज या ठिकाणी आले. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. हा खरोखरच योगायोग म्हणावा लागेल मला वाटत नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच दिसत आहे,” असे विधान करत खा. सुप्रिया सुळे यांनी एक मोठे संकेत दिले.
गुरु पौर्णिमेनिमित्त आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येऊन अभिवादन केले. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील यांनी उपस्थिती लावलीहोती. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खा. सुळे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे नेण्याचे प्रांजळ प्रयत्न आम्ही आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिक हे करीत आहोत. गेली अनेक वर्षे यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दरवर्षी मी कराडला येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत असते. मी कालच या ठिकाणी येणार होते. मात्र, काल डीपीडीसीच्या बैठकीमुळे येता आले नाही. मात्र, आज या ठिकाणी आले आणि आज गुरुपौर्णिमा आहे हा खरोखरच योगायोग म्हणावा लागेल. मला वाटतं नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच दिसत आहे.
पवित्र स्थळ असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या या स्मृतिस्थळी कोण गुरुदक्षिणा मागणीसाठी येत कि नाही हे मला माहित नाही. मात्र, आपल्यापेक्षा आयुष्यात जे मोठे असतात वयाने, पदाने त्यांचा आशीर्वाद मिळने हेच माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. त्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा जो योग्य आला आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी येऊन नतमस्तक झाले. आज नतमस्तक झाल्यानंतर मी काहीही मागितले नाही. मी कधी मागत नाही, आपण मोठ्या लोकांना काय मागणार. ते जे देतील ते आपल्या पदरात घ्यायचे आणि पुढे पुढे जायचे असे खा, सुप्रिया सुळे यांनी म्हटले.