सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याची सूचना संबंधित अधिकार्यांना देत आहे.
अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर जादूटोणाविरोधी कायदा राज्यात लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनास विनंती आहे की, हे कक्ष स्थापन झाल्यावर त्यांची जिल्हावार माहिती पोलिसांनी जनतेसमोर जाहीर करावी. जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील.
अंनिसच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, प्रशांत पोतदार, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, फारुक गवंडी, विनोद वायंगणकर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रविण देशमुख, डॉ. अशोक कदम, प्रकाश घादगिने यांनी हे पत्रक काढण्यात आले आहे.
हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासन पाऊल : मुक्ता दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासन पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र अंनिस या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.