पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त 10 वी व 12 वी मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी “विद्यार्थ्यांनी त्यांना जे क्षेत्र आवडते त्या आवडीच्या क्षेत्रात त्यांनी करिअर करावे,” असे प्रतिपादन शेख यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार आनंद गुरव यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शेख म्हणाले, आपल्या भागाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो याचा विचारही विद्यार्थ्यांनी करावा. त्यांना मोठे करणाऱ्या भागाचा विकास झाला पाहिजे, असा ध्यास प्रत्येकाने बाळगल्यास राज्याचा चांगला विकास शक्य आहे. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पुस्तक व रोखरक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच मुकबधीर विद्यार्थी व विद्यार्थिंनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.