सातारा प्रतिनिधी | जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कास पठारावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जुंगटी (ता. सातारा) गावास नुकतीच भेट दिली. यावेळी शेख यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद देखील साधला. यावेळी ग्रामस्थांसोबत सहवास, गप्पा, गावातच केलेल्या मुक्कामातून समीर शेख यांना जुंगटी गाव भावले.
सातारा तालुक्यातील जुंगटी हे कास परिसरातील एक दुर्गम गाव असून कास, जुंगटी, बामणोली, मुनावळे परिसरासह संपूर्ण कोयना काठ सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असल्याने या भागात भटके, निसर्ग अभ्यासक नेहमीच येत असतात. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुंगटी गावाला गुरुवारी अचानकपणे भेट दिली. गाव भेट, गावकरी, मुलांसोबत संवाद आणि परिसरातील निसर्गात मनमुराद भटकंती असा त्यांचा कार्यक्रम होता.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे पोलीस अधिकारी आपल्या गावात कोणताही लवाजमा न घेता आपल्या गावात आल्याचे पाहून गावकरी आवाक झाले. त्यांची शाळेच्या दारात गाडी थांबताच त्यांनी शाळेला भेट देऊन, येथील प्राथमिक शाळेत किलबिलणारे उद्याचे विश्व असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा गोष्टी केल्या. शिक्षक राजीव कदम यांच्याकडून शाळेतील पटसंख्या कमी का व अन्य गोष्टींची माहिती करून घेतली. रोजगाराअभावी गावातील कुटुंब शहरात स्थलांतरित झाली असल्याने पटसंख्या कमी असल्याची माहिती देत अन्य विषयी माहिती दिली. नंतर शेख हे एका दुर्गम छोट्याशा गावात शांतमय वातावरणात राहण्यासाठी चालत गेले. तर दुसऱ्या दिवशी ट्रेकिंग करत परत आले. नंतर वाहनाने साताराकडे रवाना झाले.