कराडात सावकारांच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 7 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । खासगी सावकारांकडून पैसे घेतल्यानंतर त्याच्याकडून त्रास दिला जात असल्याच्या घटना कराड शहरात अनेकवेळा उघडकीस आल्या आहेत. या प्ररकरणी पोलिसांनी सावकारांवर देखील कारवाई केली आहे. अशीच एक घटना कराड शहरात घडली असून खासगी सावकारांकडून घेतलेल्या १८ लाख रुपये कर्जापोटी ३३ लाख रुपयांची रक्कम परत देऊनही सावकारांकडून त्रास दिला जात असल्याने एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७ खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युगल दिलीप सोळंकी (रा. शनिवार पेठ. ता. कराड) असे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम उर्फ सोनू ढेब (रा. शुक्रवार पेठ, कराड), शुभम शांताराम मस्के (रा. खंडागळेवाडा, शुक्रवार पेठ, कराड), ओंकार गायकवाड (बैलबाजार रोड, कराड), निलेश पाडळकर, दादा मस्के (दोघेही रा. सात शहीद चौक, कराड), अथर्व चव्हाण (रा. उंब्रज, ता. कराड), तेजस चव्हाण (रा. आझाद चौक, कराड) यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील शनिवार पेठेत राहत असलेल्या युगल सोळंकी यांना व्यापारासाठी पैशाची गरज होती. त्यांनी जून २०२३ मध्ये शुभम ढेब व शुभम मस्के यांच्याकडून ४ लाख रुपये व्याजाने घेतले. या रकमेपोटी त्यांनी आज अखेर १२ लाख रुपये त्या दोघांना परत केले. मात्र, तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगून त्या दोघांकडून युगल सोळंकी यांच्याकडे पैशाची मागणी केली जात होती.

वारंवार मागणी होऊ लागल्यामुळे या दोघांचा त्रास टाळण्यासाठी सोळंकी यांनी मलकापुर येथील ओंकार गायकवाडकडून ४ लाख ६१ हजार रुपये तसेच निलेश पडळकर याच्याकडून अडीच लाख, अथर्व चव्हाण याच्याकडून ४ लाख रुपये घेतले. या सर्वांना त्यांनी वेळोवेळी पैसे परत केले. एकूण १८ लाख ११ हजार रुपये कर्जापोटी युगल सोळंकी यांनी ३२ लाख ९९ हजार ३०० रुपये संबंधित खासगी सावकारांना परत केले आहेत. मात्र, तरीही संबंधितांकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती.

तसेच दुकानात येऊन ते सोळंकी यांना धमकावत होते. हा त्रास सहन न झाल्याने युगल सोळंकीने २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ७ सावकारांवर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.