विधानसभेच्या रणधुमाळीत शेतशिवारे, माळरानं गजबजली; ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असू. अशात या वर्षातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातील ऊसतोड
मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

लवकरच ऊसतोड सुरू होणार असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात शेताच्या कडेला, माळरानावर तसेच मोकळ्या जागांवर राहुट्या टाकून सहकुटुंब विसावली आहेत. त्यांच्या राबत्याने शेतशिवार, माळरानं गजबजली आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ साखर कारखाने असून ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठे आहे. यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलयर पेटवून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून लवकरच ऊसातोडणी सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या
ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यातील ऊसतोड मजूर दाखलझाले आहेत. ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आठ ते दहा कुटुंब एकत्र दाखल होत आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतशिवारात मोकळी जागा पाहून राहुट्या टाकल्या आहेत. हंगाम संपेपर्यंत हे कामगार सहकुटुंब वास्तव्य करणार आहेत. अद्याप ऊसतोड सुरू नसल्याने दळणवळण, पाणी, जीवनावश्यक गोष्टींची उपलब्धतेसह सुरक्षित जागा पाहून राहुट्या उभारल्या जात आहेत.

राहुट्यांसाठी काही ठिकाणी गावाबाहेरच्या माळरानावर गवत, झाडे झुडपे काढून स्वच्छता केली जात आहे. सहपरिवार ऊसतोडीसाठी आल्याने राहुट्यांवर दिवसभर माणसांची गजबज राहत आहे. एरवी ओस पडलेली निर्मनुष्य असलेली माळरानं, शिवारं ऊसतोड कामगारांच्या वास्तव्यामुळे वर्दळली आहेत.