सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून १७ कारखान्यांकडून ९४ लाख ३१ हजार २८८ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ९.७० टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात ९१ लाख ५० हजार २७ क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे.
सन २०२३-२४ या काळातील गळीत हंगाम ६ एप्रिलपर्यंत सुरू होता. त्या हंगामात जिल्ह्यात १०५ लाख २३ हजार ८८१ टन उसाचे गाळप करून १०.४९ टक्के साखर उताऱ्यासह ११० लाख ३४ हजार ५६८ क्विंटल साखर उत्पादित केली होती. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनामध्ये १८ लाख ८४ हजार ५४१ क्विंटल इतकी घट झाली आहे.
ऊसगाळपात काही अपवादवगळता सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर असलेल्या जरंडेश्वर (गुरू कमोडिटी) या खासगी कारखान्याने आघाडी कायम राखली आहे. तर साखर उत्पादनात कृष्णा सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. उताऱ्यात रयत सहकारी साखर कारखाना १२.०८ टक्के उतारा घेत आघाडीवर राहिला आहे.
जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी ४४ लाख ८३ हजार ४५५ टन ऊस गाळप करत ११.५० टक्के सरासरी उताऱ्यानुसार ५१ लाख ५६ हजार ९४२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे, तर खासगी कारखान्यांनी ४९ लाख ४७ हजार ८३३ टन उसाचे गाळप करत ८.०७ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ३९ लाख ९३ हजार ८५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.