कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील शेतकरी सौ. विद्या निवासराव माने यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी (दि. 18) दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत आढळून आली होती. या घटनेची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच घटनस्थळी जाऊन त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी बिबट्या ही जवळपासच असणार हे ओळखून वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या मदतीने रात्री 7.30 वाजता मादी व पिल्लांचे पुनर्मिलन घडवून आणले. या पुनर्मिलनची दृश्ये वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कराड तालुक्यातील हिंगनोळे गाव परिसरातील ऊसाच्या शेतात आढळलेल्या मादी बिबट्याच्या नवजात पिल्लांचे व मादीचे पुनर्मिलन वन विभागाने घडवून आणले. या भेटीतून प्राण्यांमधील मातृत्वाचे दर्शन घडले आहे. आपल्या नवजात बछड्यांना सोडून अन्नाच्या शोधात गेलेली मादी बिबट्या हि पुन्हा रात्री परतली आणि ती आपल्या बछड्यांचा सुखरूप परत घेऊन गेली. हे सर्व कार्य वनविभागाने रावबिलेल्या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे पार पडले आहे.
मादी बिबट्या व पिल्लांच्या पुनर्मिलापाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल परिविक्षाधीन सुजाता विरकर ,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटेसह सदर कारवाईमध्ये वनपाल सागर कुंभार , वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने यांनी सहभाग घेतला. वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्सचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार , अनिल कोळी, सचिन मोहिते यांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.