सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. तोच वारसा पुढे घेऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. त्यांच्या पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व जिल्हा ठामपणे उभा राहील. जनतेमुळे नेते निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे महत्वाचे विधान ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी केले.
फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणी, तालुका कार्यकारिणी व विविध समित्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा नुकताच पार पडला. यावेळी रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप आदींसह शहर व तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नेते शिंदे म्हणाले की, फलटण तालुक्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहून ते निश्चितपणे दाखवून देईल. महाराष्ट्रात सध्या तोडफोड, फूट पाडा, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करा, असे भयानक प्रकार सुरू आहेत; परंतु ही महाराष्ट्राची व जिल्ह्याची संस्कृती नाही.
या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे. विपरित राजकीय परिस्थितीतही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणाला लाजवेल, अशा पद्धतीने पवार यांचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी दुसरीकडे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र सर्वत्र आहे. फलटण तालुकाही त्यास अपवाद नाही. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नीरा-देवघर, धोम-बलकवडी, रेल्वे व औद्योगिक प्रकल्प, कारखानदारीमध्ये पवार यांचे योगदान मोठे असल्याचे शिंदे यांनी म्हंटले.