पाटण प्रतिनिधी | उद्या रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद, आणि “ज्ञानोबा-तुकाराम” चा गजर करत बालदिंडी काढण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मुखात अभंग आणि ओठांवर ‘माऊली’चा जयघोष घेऊन दिंडीमध्ये सहभाग घेतला. डोक्यावर तुळशीचे रोप, हाती भगवे झेंडे, सुंदररित्या सजवलेली विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, हे सर्व पाहून परिसरात भक्तिभाव दाटून आला.
शाळेच्या शिक्षक, शिक्षिका आणि पालकांनीही या उपक्रमात खांदा मिळवून दिंडीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख व्हावी, संस्कार घडावेत आणि सांस्कृतिक जाणीव वाढावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. “पंढरीची वारी घरपोच आणण्याचा प्रयत्न आज कोयनानगरच्या विद्यार्थ्यांनी केला.