पोलीससह ‘महावितरण’च्या भरतीसंदर्भात पाटण तालुका मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । एसईबीसी १० टक्के मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत महावितरण आणि पोलिस मेगा नोकरभरती थांबवावी आणि सध्या सुरू असलेली मेगा भरती पुढे ढकलावी अशी मागणी पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. मराठा समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत दहा टक्के आरक्षणाची घोषणा करताना, यापुढे शासकीय नोकरभरतीत हे आरक्षण लागू होईल, असे सांगितले होते. मात्र, राज्यात महावितरण कंपनी आणि पोलीस दलात सुरु असलेल्या नोकरभरतीत दहा टक्के मराठा आरक्षण दाखल्यांची अंमलबजावणी शासन स्तरावरून सुरू नसल्याने समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आपली फसवणूक तर झाली नाही ना?, अशी त्यांची भावना आहे.

महावितरणमधील साडेपाच हजार जागांच्याभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मार्च, तर पोलीस दलातील 17 हजार जागांच्या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. महावितरणमधील पदांसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली असून, पोलीस भरतीचे अर्ज करण्यासाठी केवळ 11 दिवस बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या एसईबीसी प्रवर्गातील दहा टक्के आरक्षणासाठी उमेदवारांना मराठा जातीचे दाखले कोणत्या अटी-शर्तींखाली द्यायचे, हेच शासनाने अजून निश्चित केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केल्यापासून नोकरभरतीसाठी मराठा उमेदवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारुन वैतागले आहेत.

येत्या दहा दिवसांत मराठा जातीचे दाखला, नॉन क्रिमिलेयर व उत्पन्नाचे दाखले यांचा मेळ कसा बसवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अद्याप अंतिम मार्गदर्शक आदेश आम्हाला मिळालेले नाहीत, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.