कराड प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी छापा सत्र राबविले जात आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील वाठार गावचे हद्दीत बेकायदेशीर देशी/विदेशी दारुची वाहतूकीवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्व, विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना अधीक्षक श्री. रविंद्र आवळे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने वाठार, ता. कराड, जि. सातारा गावचे हद्दीत बेकायदेशीर देशी/विदेशी दारुची वाहतूक पकडली. यावेळी सचिन तुकाराम सकटे, ( रा. रेठरे बु, ता. कराड, जि. सातारा) या इसमा विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर इसमाच्या ताब्यातून देशी/विदेशी दारूचे विविध बँडचे एकूण ३ बॉक्स किंमत १४ हजार ६२० रुपये तसेच हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयात वाहनासह एकूण ६४ हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. अजयकुमार पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागु झाले पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य, निर्मिती, वाहतूक व विक्री बाबतचे एकुण ८६ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये ८८ आरोर्पीना अटक करून त्यांचे ताब्यातुन १८ वाहनांसह एकुण ३४,२०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये बेकायदा हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची बेकायदेशीर निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन श्री. रविंद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.