‘राज्य उत्पादन शुल्क’ची दारु वाहतूकीवर धडक कारवाई; 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी धडक कारवाई करत गोवा बनावटीची अवैध्यरिती दारू ताब्यात घेतली. यावेळी कराड, पाटण व खंडाळा या तालुक्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहने असा सुमारे 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला. तर चार जणांना अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीची तसेच हातभट्टीच्या दारूची छुप्या पद्धतीने बेकायदेशीररितीने कराड, पाटण तसेच खंडाळा येथे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय सुर्यवंशी व विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी पथकी तयार करण्यात आली. आज सकाळी कराड, पाटण तसेच खंडाळा या तिन्ही ठिकाणी सापळा रचला. यावेळी शिंदेवाडी ता. खंडाळा येथे अवैध हातभट्टी दारुची चोरटी वाहतूक पकडण्यात आली. यावेळी सुरुवातीला खंडाळा तालुक्यात दारूची वाहतूक करणाऱ्या आज चारचाकीवर कारवाई करण्यात आली. या चारचाकीतून राहुल जितेंद्र कुंभार (रा. नायगांव ता. भोर जि. पुणे) याला ताब्यात घेत एक चारचाकी वाहनासह 980 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर चिपळून-कराड मार्गावर मौजे गोपाटवाडी ता. पाटण गावाच्या हद्दीत कराडच्या दिशेने चालणारी गोवा बनावट विदेशीदारूची वाहतूक पकडून एक चारचाकी व एक सहाचाकी वाहनासह गोवा बनाबटदारुचा एकूण रुपये 19 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे गोरखनाथ बाबुराव पवार (रा. बेलवाडे खुर्द ता. पाटण), प्रदीप कृष्णात सलते (रा. सलते पो. बीबी ता. पाटण) व दिनेश दगडू कदम (रा. वालोपे ता. चिपळूण जि.रत्नागिरी) यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 81, 83, 90,103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहन असा एकूण रुपये 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे सहा दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, सचिन खाडे, जवान सागर आवळे, अजित रसाळ, किरण जंगम, आप्पासो काळे, सुरेश अब्दागिरे, मनिष माने, राजेंद्र आवघडे, आबासोब जानकर, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.

जिल्हयामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारू तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती विक्री वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ राज्य उतपादन शुल्क कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, किर्ती शेडगे यांनी केले आहे.