संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार : पोलीस अधीक्षक समीर शेख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहत असलेल्या लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अनेक गोष्टी केल्या जात आहेत. दरम्यान, संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्याचा निर्णय आता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याचा प्रारंभ लोणंद पोलीस ठाण्यापासून नुकताच करण्यात आला. या यंत्रणेच्या वतीने ग्रामस्थांना, तसेच अडचणीत असणार्‍या नागरिकांना गुन्हेगारी रोखण्यासोबत पोलिसांचे साहाय्य मिळणार आहे. ही योजना जिल्ह्यामध्ये यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद आणि सातारा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसुरक्षा यंत्रणा योजना जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. याविषयीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे नुकतेच पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले की, गावामध्ये एखादी दुर्घटना घडली, तर एकाच वेळी शेकडो ग्रामस्थांच्या भ्रमणभाषवर माहिती मिळून तात्काळ संबंधितांना साहाय्य मिळणार आहे.

संकटकाळामध्ये आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल फ्री’ क्रमांक १८०० २७०३६००, तसेच ९८२२११२२८१ या क्रमांकावर दूरभाष करावा. या वेळी संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना दूरभाष स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेला आळा घालणे शक्य होणार असल्याचे अधीक्षक शेख यांनी सांगितले.