सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. करहर, कुडाळ परिसरातील खर्शी, हातगेघर, महू, दापवडी, बेलोशी, काटवली, रुईघर आंदी परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीनसह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
सध्या या परिसरात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. पावसाच्या रिपरिपीने हातातोंडाशी आलेले पीक काढणे सुद्धा मुश्कील झाले आहे. रात्रीच्या वेळी पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन भरडण्यासाठी सुद्धा अडचण येत आहे. काढता येत नसलेले सोयाबीन शेतातच आहे. काही ठिकाणी हे सोयाबीन पुन्हा उगवणीच्या तयारीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
परतीच्या पावसाने शेतमालाला मोठा फटका बसला आहे. परिसरात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वारे आणि पावसाने या परिसरात काढणीला आलेले भात भुईसपाट झाल्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. शेतात भात पडल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. दिवाळीतही असाच पाऊस राहिल्यास भात पीक काढणी देखील अडचणीत येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.