कराड प्रतिनिधी । जुलै महिना सुरु झाला तरी पावसाच्या केवळ हलक्याशा श्री कोसळत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आभाळाकडं डोळं लावून बसला आहे. सध्या ऋतुमान बदलल्यामुळे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे पेरण्यांचे नियोजनच कोलमडले आहे. कराड तालुक्यात पाहिल्यास आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून 34 हजार हेक्टरवरील पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गत आठवड्यात सुरुवातीला मान्सून पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांसह सर्वांमध्ये आनंद पसरविला. मात्र, एक दोन दिवस कोसळल्यानंतर वरुणराजाने पुन्हा दडी मारली. कराड तालुक्यात हलक्या सरीशिवाय दमदार पाऊसच झालेला नाही. पेरणी व टोकणीसाठी शेतात ओलाव्याची गरज असते. मात्र, ओलावा होईल असा पाऊसच तालुक्यात झालेला नाही. पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोकणी, पेरणीची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत.
पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी इतक्यात पेरण्या न करू नये त्या थांबवाव्यात. 90 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्यांची गडबड करू नये, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. कराड तालुक्यात आतापर्यंत खरीप क्षेत्राची कृषी विभागाकडे 38 हजार 472 हेक्टर इतकी नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ 2 हजार 200 हेक्टर म्हणजेच केवळ तीन टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली आहे. अद्यापही 97 टक्के क्षेत्र पेरणीविना बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक : दत्तात्रय खरात
कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात तसेच तालुका स्थरावर खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी नियोजन करण्यात आले आहे. पावसाने सध्या ओढ दिली आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीसाठी 90 ते 100 मिलिमीटर एवढ्या पावसाची आवश्यकता असते. इतका पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
मंडलनिहाय अपेक्षित पेरणीक्षेत्र पुढीलप्रमाणे…
कराड तालुक्यात चार मंडलक्षेत्र येतात. त्यामध्ये कराड, सैदापूर, उंब्रज आणि उंडाळे या मंडलाचा समावेश होतो. या मंडलक्षेत्रात कराड : 7 हजार 794, सैदापूर : 9 हजार 163, उंब्रज : 9 हजार 951, उंडाळे : 11 हजार 669 इतके हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.
पीकनिहाय नोंदले गेलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे…
कराड तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, भुईमूग, मका उडीद, मूग आणि सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. यामध्ये सोयाबीन : 17 हजार 584, भात : 5 हजार 426, भुईमूग : 10 हजार 204, मका : 685, तूर : 20, उडीद : 50, मूग : 30, सूर्यफूल : 10 या पिकांचा समावेश आहे.
अपेक्षित पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे…
1) गळीत धान्य : 27 हजार 37, 2) तृणधान्य : 10 हजार 558, 3) कडधान्य 982