कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओगलेवाडीत दरोडा टाकून सुमारे ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासात दोघा संशयितास ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करत त्यांच्याकडून ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरोडा प्रकरणात खटाव तालुक्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाते जावई आणि सासरे असे आहे. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
विनायक काळे (वय ४६), सिद्धांत भोसले (वय २३) दोघेही (रा. खटाव)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील उद्योजक कै. वसंत दिनकर खाडे यांचे बंद घर फोडून घरातील १०९.५ तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी भेट दिली.तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या टीमने बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. अखेर चोवीस तासाच्या आत विनायक काळे व सिद्धांत भोसले या दोघांना खटाव तालुक्यातील तडवळे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी ८८ तोळे सोने व रोख एक लाख रूपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घरफोडी आली वॉचमनच्या निदर्शनास
बंगल्यातील लाईट बंद करण्यासाठी गेल्यानंतर बंगल्याच्या वॉचमनला तिसऱ्या मजल्यावरील दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. वॉचमनने घटनेची माहिती प्रतिक खाडे यांना दिली. याची माहिती पोलिसांना समजताच डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं.
बंगल्याच्या पाठिमागून चोरट्यांचा प्रवेश
बंगल्याच्या समोर सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याठिकाणी रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक होते. बंगल्याच्या पाठीमागील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची खिडकी आणि गॅलरीतील रेलिंगला दोऱ्या बांधून चोरटे बंगल्यात घुसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ११० तोळे दागिणे आणि दीड लाखांची रोकड लंपास केली.