सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल सोमवारी राज्याचा सन २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या विकासकामांसाठी भरीव अशा रक्कमेची तरतूद केलेली आहे. खास करून पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे स्कायवॉकची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण, जावळी तालुक्यातील मुनावळेतील जल पर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तर पाटणमधील हेळवाक येथे कोयना जल पर्यटन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक विविधता असलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटनातून रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, काल मंत्री अजितदादांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कोयनानगरला स्काय वॉक उभारणी आणि नेहरू उद्यानाचे सुशोभिकरण करण्याची तसेच नायगावमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एकूण १९६३ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुढील दहा वर्षांत १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आरोग्य, पर्यटन धोरणही आखण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचा विचारकरता आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा येथे त्याच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी शिवसृष्टीसारखे विविध प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील जल पर्यटनासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच ठाणे आणि कोयनानगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्काय वॉक उभारणीलाही मंजुरी देण्यात आली आहे. एकूणच रोजगाराभिमुख विकासाची पर्यटन क्षेत्राची क्षमता लक्षात घेऊन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी भरीव अशी २ हजार ८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोयना जल पर्यटन प्रकल्पाचे फायदे
जल पर्यटनाच्या माध्यामतून स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवकांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन ठरणार आहे. यासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. रॅम्प ,जेट्टी, पव्हेलियन, फ्लोटिंग जेट्टी,जेट स्की पार्किंग जेट्टी यासारख्या पायाभूत सुविधांसह काय किंग, जेट स्की, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, रिव्हर राफ्टींग, प्यारासिलिंग, बंपर राइड, बनाना राईड, सर्फिंग यासारखी जल पर्यटन आकर्षणे पर्यटकांसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे कोयना धरणाचा परिसर लोकप्रिय ठरणार असून पाटण तालुका व कोयना नदीच्या परिसरातील स्थानिकांना याचा फायदा होणार आहे. तब्बल 40 किलोमीटर लांबीचे कोयना नदीचे पात्र असून पाण्याचा दर्जा उत्तम आहे. दर्जेदार जल पर्यटन विकासामुळे पर्यटकांचा ओघ या ठिकाणी वाढेल. कृषी आणि वन पर्यटनही वाढीला लागेल. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊन यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल.