कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील धोंडेवाडीत दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे दर्शन झाले झाल्याची घटना नुकतीच घडली. तीन शेतकऱ्यांसमोरच रानातून तासभर फिरत फिरत बिबट्या आपल्या बछड्यांना घेऊन डोंगराच्या दिशेने गेला. दरम्यान, बिबट्याने डोंगर नावाच्या शिवारात रात्री एका वस्तीवरील रेडकावर हल्ला करत पायाचा चावा घेऊन जखमी केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी येथे डोंगर खिळे नावाच्या शिवारात सुनील शेडगे, प्रताप मोरे व मनोज काकडे यांची शेती असून प्रताप मोरे, सुभाष शेडगे हे शेतात वैरण काढण्यासाठी रानात गेले होते. वैरण काढत असताना प्रताप मोरे यांना दोन बछड्यांसह मादी बिबट्या रानातून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जवळच असलेल्या सुभाष शेडगे यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांची घाबरगुंडी उडाली.
यावेळी मनोज काकडे यांच्या उसात किमान अर्धा तास दोन पिल्ले व एक मादी बिबट्या ठाण मांडून बसले होते. थोड्या वेळाने ती तिथून पुढे सुनील शेडगे यांच्या वस्तीवरील विहिरीजवळून पुढे प्रताप मोरे यांच्या उसाच्या शेतात गेली. ही घटना दुपारी किमान एक तास सुरू होता. डोंगराच्या दिशेने गेलेल्या बिबट्यांना पाहून शेतकऱ्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, वाघजईचा माळ नावाच्या शिवारात प्रकाश ताटे यांची वस्ती आहे.
या वस्तीवर बांधलेल्या रेडकावर रात्रीच्या वेळी हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने रेडकाच्या पायाचा चावा घेतला. मात्र, इतर जनावरांच्या आरडाओरडा व बचावामुळे रेडकाला सोडून बिबट्याने पलायन केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. मात्र, धोंडेवाडी परिसरात बिबट्याचा सततचा वावर वाढल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.