कराड प्रतिनिधी | पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत एका महिला सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी कंपनीच्या पार्किंग एरियात घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभदा कोदारे (२८ वर्षे) (Shubhada Kodare) यांचा मृत्यू झाला. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मृत्यू पावलेल्या शुभदा या मुळच्या कराड येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी शुभदा कोदारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शुभदा शंकर कोदारे ( वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) यांच्या हत्येच्या प्रकरणात कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) (Krishna Satyanarayan Kanoja) याला अटक झाली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात शुभदाची बहीण साधना शंकर कोदारे (वय २६, रा. काळेवाडी फाटा, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात त्यांचा उजवा हात निखळला. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. सुमारे दोन वर्षापूर्वी वडिलांच्या उपचारासाठी उसने म्हणून घेतलेले चार लाख रुपये संबंधित तरुणीने परत केले नाहीत. तसेच वडिलांच्या उपचारासाठी देखील तिने हे पैसे घेतले नव्हते या रागातून तरुणीवर हल्ला करण्यात आला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली.
तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली मात्र, हल्ल्यामागचे निश्चित कारण काय आहे, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, तरुणी मूळची सातारा जिल्हयातील कराड येथील असल्याचे तपासातून समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.