पाटणमध्ये थोड्याच वेळात धडाडणार शिवस्वराज्य यात्रेची तोफ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह खासदार डॉ. अमोल कोल्हे राहणार उपस्थित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या (NCP) वतीने राज्यभर सुरु असणारी ‘शिवस्वराज्य’ यात्रा (Shiva Swarajya Yatra) आज सोमवार दि. १४ रोजी पाटणमध्ये धडकणार आहे. येथील बा. दे. महाविद्यालयाच्या पटांगणावर सोमवार दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पाटण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शेलार म्हणाले की, पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil), खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, दीपक पवार तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिवस्वराज्य यात्रेसाठी पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, आजी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी रहावे, असे आवाहन राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.