महामार्गावर महिलांसाठी तातडीने प्रसाधनगृहांची व्यवस्था करा; मंत्रालयात बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

0
106
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यातील महामार्गावर महिला प्रसाधन गृहांच्या सोयी-सुविधांबाबत मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. “राज्यभरात विविध महामार्गांवरुन लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाश्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महामार्गावर महिलांसाठी प्रसाधनगृहे उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असते. माता-भगिनींना प्रवास करताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी सर्व सुविधांयुक्त प्रसाधन गृहांची व्यवस्था उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कार्यान्वित करा, अशा सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदीती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन सदाशिव साळुंखे, संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, महिला प्रवाश्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दूष्टीने महामार्गावरिल पेट्रोलपंपांच्या शेजारी, टोल नाक्याजवळ किंवा इतर सुयोग्य ठिकाणी दर्शनी भागात सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच २५ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावांमध्येच या बाबींचा समावेश करावा. सर्व स्वच्छतागृहांची रचना एकसारखी ठेवावी. त्याचप्रमाणे प्रसाधन गृहांच्या येथे कटाक्षाने स्वच्छता राखण्यात यावी. आवश्यक प्रमाणात लाईट व्यवस्था ठेवली जावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रसाधन गृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

या सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रसाधन गृहांची व्यवस्थापन यंत्रणा महिला बाल विकास विभागाच्या सहकार्याने कार्यान्वित करावी. स्थानिक महिला बचतगटांना स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सोपवण्यात यावे, असे मंत्री भोसले यांनी म्हटले. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत महिला बचतगटांना या कामात सहभागी करुन घेता येईल असे स्पष्ट केले. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिला प्रवाशांना प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध असणे हे गरजचे आहे, यादृष्टीने निश्चितचं या बाबींची पूर्तता झाली पाहिजे, असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी मांडले.